"संस्था मोठी आहे, माणसं नव्हेत, संस्था चिरस्थायी असतात, व्यक्ती आज आहेत उद्या नसतील हे सतत लक्षात ठेवा"
About Baburao Joshi and Malatibai Joshi:
"संस्था मोठी आहे, माणसं नव्हेत, संस्था चिरस्थायी असतात, व्यक्ती आज आहेत उद्या नसतील हे सतत लक्षात ठेवा' हा संस्थापक कै.
बाबुराव जोशींचा विचार नव्या कार्यकर्त्यांना नेहमीच अक्षय ऊर्जा प्राप्त करून देतो.
बाबुराव जोशींनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९२० साली आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात रत्नागिरीत महाविद्यालय व्हावे
अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांची दूरदृष्टी, अथक प्रयत्न, व्यापक जनसंपर्क व संघर्षातून १९४५ साली गोगटे- जोगळेकर महाविद्यालय सुरू झाले.
संस्थेने नव्या शाखा व उपक्रम सुरू करून अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली.
बाबुरावांनी अनेक आव्हाने समर्थपणे पेलली. नवी स्वप्ने पाहिली आणि आयुष्यभर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट घेतले.
वकिलीचा त्याग केला. अपमान सहन केला; परंतु ध्येयपूर्तीच्या ध्यासाने, मालतीबाईंच्या सहकार्याने अत्यंत तळमळीने, निरलस वृत्तीने व प्रामाणिकपणे
संस्थेचा लक्षणीय विस्तार केला.
कै. मालतीबाईंनी एकेक आणा गोळा करून भाऊबीज फंडातून महिला विद्यालयास आर्थिक स्थैर्य दिले. त्याकाळात वेळप्रसंगी मालतीबाई महिला विद्यालयात
एक तास घेत व उन्हातून चालत जात शिर्के हायस्कूलमध्ये दुसरा तास घेत असत. मालतीबाईंची संस्थेवरील निष्ठा अविचल होती.
संस्थेच्या इमारतीची कौले बदलण्यास मदत करणारे बाबुराव, दिवाळी समोर असतानाही गिरणीच्या गल्ल्यातील तीन रुपये देऊन शिक्षकाची गरज भागविणारे बाबुराव,
निधी संकलनाकरिता चित्रपटाची रिळे घेऊन गावोगाव पायपीट करणारे बाबुराव आणि वाढत्या वयात देखील आपली जुनी सायकल वापरून संस्था उभी करणारे बाबुराव
आम्हाला दीपस्तंभासारखे आहेत.
बाबुराव आणि मालतीबाईंनी प्रज्वलित केलेला हा अंतरीचा ज्ञानदीप आपण सर्वांनी तेवत ठेवला पाहिजे.